“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात RSS चीफ मोहन भागवत मागच्या काही दिवसांपासून विविध विषयावर परखड मत मांडताना दिसून येत आहे तसेच अनेक विषयांसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता मोहन भागवत यांनी देशाच्या फाळणीवरून पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. फाळणीवेळी भारताला जे भोगावे लागले आहे, भारताने जे सोसले आहे, ते कधी विसरता येणार नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नोएडा येथे कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी फाळणीवेळच्या कटू स्मृतींना उजाळा दिला. आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवे. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

तसेच पुढे भगवंत म्हणाले की, हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे. भारताने फाळणीच्या काळात जे सोसले आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळे पूर्वीसारखे होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असे मानणारी ही विचारधारा नाही. मात्र, इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की, फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचे, लढाईचं मूळ हेच होते, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

Team Global News Marathi: