मुंबई | मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं आज शिवसेनेला डिवचलं होतं. त्यामुळे या मुद्यावर शिवसेना आणि मनसे असा सामना सुरु झाल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळालं होतं. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांनी या भूमिकेवर मनसेवर जोरदार टीका केली होती.
मनसेनं आज शिवसेनाभवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिका ऐकवली. रामनवमीचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यानंतर पोलिसांनी भोंगा जप्त केला आणि मनसैनिकांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस स्थानकात हनुमान चालिसाचे पठण करून या कारवाईला विरोध केला होता.
या सगळ्या प्रकारानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. आता आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मनसे काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.