जाणून घ्या महाराष्ट्रातील घराघरात केलं जाणारं पिठलं…अनं त्याची खासियत

जाणून घ्या महाराष्ट्रातील घराघरात केलं जाणारं पिठलं…अनं त्याची खासियत

महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात कधीही, केंव्हाही, अगदी कुठल्याही सुख दुःखात सदैव मदतीला धावून येणारा.. तत्पर असा हा एकमेव जिव्हाळ्याचा पदार्थ…

म्हणजे बघा एखाद्याच्या घरी मयत झाली असेल तर त्यांच्या दुखावट्यात अन्न म्हणून पिठलं भात नेवुन देतात किंवा करतात….आणि दर गुरुवारी महाराजांना प्रसाद म्हणून पिठल्याचाच नैवैद्य करतात…

बेसन हा या पिठल्याचा आत्मा…

पिठल्याचा तसा विशेष तामझाम काही नसतो….

पण याच्या जातकुळी सर्व दूर पसरलेल्या..

नांदेड जवळच्या एका दुर्गम भागात खाल्लेल पिठलं आणि तेच कोकणातल्या खेड्यात चाखलेले पिठलं एकाच प्रकारे बनवल असल तरी चव मात्र वेगवेगळी असते..हे मी अनुभवलेय…

तसे हा सर्वसामान्य पदार्थ असला तरी घरच्या गृहिणीला कधीही पटकन मदतीला धावून येणारा..

तसे याचे भाऊबंद खुप…म्हणजे बघा…

कांद्याच पिठ पेरुन केलल पिठलं…लसणाच्या फोडणीचे पिठलं….गोळ्याचे पिठलं…वड्या पडतील अस केलेल पिठलं ….तव्यावरचे पिठलं.. घोटीव पिठल …रावण पिठलं…ताकातलं पिठलं…असे आणि कितीतरी प्रकार..

त्यातल्या त्यात म्हाळसाच्या हातच कांदा घालून केलेले घट्ट मऊ पिठलं आणि मायानंदाच्या हातच वडया पाडून केलेले पिठल म्हणजे जिभेला पर्वणीच…

या कांद्याच्या मऊ घट्ट पिठल्यावर मस्त ताज़ी हिरवीगार कोथिंबीर पेरावी आणि त्यावर कच्च्या तेलाची चवी पुरती एक धार सोडावी…ते सगळ एकजीव करुन टम्म फुगलेल्या दुपदरी गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एक घास तोंडात टाकला आणि तो जिभेवर पोहोचला की ब्रम्हानंद टाळी लागलीच म्हणून समजा…

प्रत्यक्ष ब्रम्हादेवालाही दुर्लभ असा हा मेनू …

आणि त्या बरोबर तोंडी लावायला कांदा व हिरव्या मिरचीचा खरडा ( ठेचा नव्हे…खरडा वेगळा, ठेचा वेगळा…त्यावर एक स्वतंत्र लेख तयार आहे पण तो पुन्हा कधीतरी ) असेल तर खाणाऱ्याच्या दृष्टीने सुवर्ण कांचन योग…

हेच मऊ गरमागरम पिठलं छान ताटात वाढून घ्याव …बाजूला वाफाळलेला पांढराशुभ्र भात असावा…या पिठल्यावर अर्धा चमचा कच्या तेलाची धार सोडावी…आणि थोड़ा भात थोड़ पिठलं अस एकत्र कालवत… एकजीव करत हळूहळू आस्वाद घेत खाण्याची मजा नुसती अवर्णनीयच…

सगळं पिठलं आणि सगळा भात भसकन् एकत्र करून खाणं म्हणजे त्या पिठल्याचा अनादर केल्यासारख…

खरी मजा अशी लावून लावून खाण्यातच…

याच पिठल्यातला एक प्रकार म्हणजे तव्यावरच हिरवी मिरची लसुन याची फोडणी देवून केलेल पिठलं…असल चमचमीत आणि खुसखुशीत असत की विचारु नका…हे तव्यावरच पिठलं खाताना अगदी सहज त्यात असलेला खरपुस लसुन जेंव्हा दाताखाली येतोना तेंव्हा ती जी काय चव असते… त्याच वर्णन शब्दात होवुच शकत नाही…

सहलीला जाताना नेहमी उपयोगी येणारा हा पिठल्याचा प्रकार….

या तव्यावरच्या पिठल्याचा मधला भाग खावून संपला की त्या तव्याचा गोलाकार कडेला जो खरपुस खमंग भाग असतो तो खरवडून खायला जी मजा आहे ती दुसऱ्या कशात नाही…

लहानपणी आम्हा भावंडाची त्यासाठी नेहमी भांडणे व्हायची…

अर्थात हे तव्यावरच अस्सल जातिवंत पिठलं खाव ते आपल्या आई किंवा आज्जी कडूनच …त्यामागे त्यांचा चवीचा प्रदीर्घ अनुभव असतो..

आता हे पिठलं तयार होत असताना ते तयार करणाऱ्या गृहिणीचा मूड पण फार महत्वाचा बरं का…

रागात घोटून केलेले पिठलं आणि प्रसन्न मनाने मन लावून घोटून केलेले पिठलं या दोघांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक असतो…

तेंव्हा चविष्ट पिठलं हवे असेल तर गृहलक्ष्मीचा मूड सांभाळला गेलाच पाहिजे…

कोकणात मिळते ते कुळीथाच पिठलं …त्याची चव वेगळी…ते भाकरी बरोबर खाताना एक वेगळीच मजा येते.

नुसतच पिठलं भात खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही पंचतारांकित पदार्थात नाही… आणि हो… हे पिठलं आणि त्याचे प्रकार म्हणजे पिठलं भात वगैरे कुठल्याही हॉटेलात विकतही मिळत नाही…..

*पिठलं👍 जिंदाबाद

   ✍️ श्री. प्रशांत कुलकर्णी.......
ग्लोबल न्युज नेटवर्क: