लढा कोरोनाशी : साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा- शरद पवारांची सहकार मंत्र्यांना सूचना; वाचा सविस्तर

कऱ्हाड : ‘कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा,’ अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील यांची उपस्थिती होती.

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधीची माहिती घेतली. दोन्ही जिल्ह्यांतील आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

गंभीर परिस्थितीत गरजू व गरीब बाधितांना विनाशुल्क तातडीचे उपचार मिळावेत या उद्देशाने रेमडेसिवीर या महागड्या इंजेक्शन्सची कुमकही दोन्ही जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणांना याप्रसंगी देण्यात आली.

शरद पवार व्यासपीठावर असणाऱ्या साखर कारखानदारांकडे पाहूनच म्हणाले की, ‘कारखानदारांना हॉस्पिटल उभारणे काही अवघड बाब नाही. त्यांनी मनात घेतले, अद्ययावत हॉस्पिटल उभारली तर रुग्णांना चांगली सुविधा मिळणे सोपे होईल. जे साखर कारखाने बंद आहेत. त्या कारखान्यांची रिकामी गोडावून उभारलेली मोठी पत्र्याची शेडसुद्धा ताब्यात घेऊन ठेवली पाहिजेत. तेथे सुद्धा कोरोना क्वॉरंटाईन सेंटर उभारता येतील. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: