फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या नांदेडमधील (Nanded) कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपस्थिती केला.

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना भेटले. पण काहीही न बोलताच ते तिथून निघून गेले.

Team Global News Marathi: