फटकारे कसे मारायचे हे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांतून शिकलो!

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘फटकारे’ या व्यंगचित्रांच्या पुस्तकाच्या निमित्ताने ‘मार्मिक’मधील जुनी व्यंगचित्रे ‘रिटच’ केली. या व्यंगचित्रांच्या रिटचच्या कामाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांचे राजकारण, संस्कार आणि फटकारा कसा मारायचा हे नियतीने माझ्याकडून गिरवून घेतले, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले.

मुंबई विद्यापीठाचे श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान व न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या सर वाकसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या छायाचित्र प्रदर्शनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनी भेट दिली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या घराची आठवण सांगितली. तेव्हा वन रूम किचनच्या घरात आमचे मोठे कुटुंब राहत होते. घराच्या पाठीमागच्या ओसरीवर शिवसेनाप्रमुख ड्रॉईंग बोर्ड घेऊन बसायचे. कोऱया कागदावर ते असे काही फटकारे मारायचे की तो कागद जिवंत व्हायचा. शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट म्हणून आम्ही त्यांना नंतर पाहिले तेव्हा मी मुलगा म्हणून त्यांच्याकडे बघत होतो.

वडील म्हणून त्यांना दररोज व्यंगचित्र काढताना बघत होतो. ती व्यं गचित्रे दर गुरुवारी ‘मार्मिक’मध्ये प्रकाशित होत असत पण हीच व्यंगचित्रे पुढे इतिहास घडवतील असे वाटले नव्हते आणि ही व्यंगचित्रे जपून ठेवायचे आम्हाला सुचले नव्हते. प्रदर्शनात महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेली शिवसेनाप्रमुखांची दुर्मिळ छायाचित्रे मांडण्यात आली होती.

Team Global News Marathi: