शेतकरी आंदोलनातून योगेंद्र यादव महिनाभरासाठी निलंबित, भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यामुळे कारवाई

 

संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर महिनाभरासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्ते यांचा समावेश होता.

यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.

भारतीय किसान युनियन अध्यक्षांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.

Team Global News Marathi: