फडणवीस -शिंदे सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू

फडणवीस -शिंदे सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. फडणवीस-शिंदे सरकारचा आजच शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोव्यातून एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करून आजच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राज भवनाच्या दरबार हॉलमध्ये 7.30 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्ता स्थापनेचा दावा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.

आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

10 दिवसानंतर राजकीय नाट्यावर पडदा
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: