भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच पंकजा मुंडे यांनी काहीवेळातच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसाची पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटोही शेअर केले.
या सगळ्यामधून पंकजा मुंडे यांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी शंका अनेकजण उपस्थित करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे शनिवारी व्यसनमुक्ती रॅलीचे अनुषंगाने बीड शहरांमध्ये आले होते. त्यामुळे भाजपच्या बीडमधील प्रमुख नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षित होते. परंतु, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोन्ही भगिनी कार्यक्रमाकडे फिरकल्याच नाहीत. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला कुत्र्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमापेक्षा पंकजा यांना आपल्या कुत्र्याचा वाढदिवस अधिक महत्त्वाचा वाटतो का, अशी प्रश्नार्थक कुजबूज बीडमधील राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.