माजी क्रिकेटपटू, खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

 

नवी दिल्ली | भाजप खासदार आणि आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIS) काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला पाठवलेल्या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असंही त्या मेलमध्ये लिहीलं आहे.

गौतम गंभीरला आठवडाभरात मिळालेली ही तिसरी धमकी आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या. २३ नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती.

या मलिननंतर खासदार गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र २४ तारखेला त्याला पुन्हा एक ईमेल आला, ज्यामध्ये ‘काल तुला मारणार होतो पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’ असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला ISIS काश्मीरने दिल्याचा आरोप आहे.

गंभीरला आलेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली होती. ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला, त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅड्रेसही सापडला आहे.

Team Global News Marathi: