१०० टक्के क्षमतेचे नाट्यगृह सुरू करा राष्ट्रवादीच्या या खासदारची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई | कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील सर्व चित्रपट आणि नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळच आली होती. त्यातच कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यामुळे राज्य सरकारकडून ५० टक्के क्षमतेने नाट्य आणि चित्रपट गृह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपट गृह सुरु करण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर ते न करता थिएटर १०० टक्के क्षमतेने सुरु करावीत. ५० टक्के क्षमतेने थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारे नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरु करा, असे अमोल कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले विविध निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात या क्षेत्रातील विविध संघटना आणि संस्थांकडून शासनाला विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: