विधानसभा अध्यक्ष निवड: शिवसेनेचा व्हिप लागू होतो का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा अध्यक्ष निवड: शिवसेनेचा व्हिप लागू होतो का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

 

राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून राजन साळवी, तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिंदे गटालाही तो व्हिप लागू होत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. हा दावा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे.

आम्हाला व्हिप लागू नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार हे गोव्यातून मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी गोवा विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यांनी काढलेला व्हिप लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

शिवसेनेकडून व्हिप जारी

विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत.

अपात्र व्हायचं नसेल तर…

शिंदे गटातील आमदारांनाही हा व्हिप लागू होत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांना जर आमदार म्हणून अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावं लागेल, असे शिवसेनेचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार राजन साळवी यांनी म्हटले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: