एकनाथ शिंदे हेच आमचं सुप्रीम कोर्ट, दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाच्या आमदारांची वकिली

आज एकीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुनही निवडणूक आयोगाकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सामना रंगला आहे. तर, दुसरीकडे दसरा मेळावा कोणाचा, दसरा मेळावा शिवतिर्थवर कोण घेणार यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचं ठिकाणं असलेलं शिवतिर्थ म्हणजेच शिवाजी पार्क हे मैदानच गोठविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता मुंबईतील शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात एक विधान केलं आहे.

दसरा मेळाव्या संदर्भात आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला पुण्यावरून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नक्की शिंदे गटाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही, आणि घेतला तर नेमका कुठे होणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम निर्णय आहे. मात्र, आमचं सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असेही लांडे यांनी यावेळी म्हटले.

शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्याची भूमिका घेत शिंदे गटाने तसा अर्ज महापालिकेकडे केला आहे. त्यामुळे, शिंदेविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे चित्र आहे.दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरु आहे. पण शिवाजी पार्कवर कुणाची तोफ धडाडणार याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

Team Global News Marathi: