राऊत यांना तुरुंगात भेटता येणार नाही, तुरुंग प्रशासनाने उद्धव ठाकरेंना नाकारली परवानगी

 

मुंबई : पात्राचाळ प्रकरणात जेलमध्ये असलेले खासदार संजय राऊत यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. “त्यांना भेटायचे असेल, तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी” असे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

­

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने फोनवरून अनौपचारिक भेटीसंदर्भात विचारपूस केली होती.तुरुंग अधीक्षकांच्या रूममध्ये राऊत यांना भेटण्याची परवानगी द्यावी यासंदर्भात विचारणा झाली.

मात्र, अशाप्रकारे भेट देता येणार नाही, रीतसर पद्धतीने न्यायालयाची परवानगी घेऊनच भेट घेता येईल, असे सांगण्यात आले. तुरुंगातील मॅन्युअलप्रमाणे केवळ रक्ताचे नाते असणाऱ्या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येते. इतर कोणाला कैद्याला भेटायचे असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

Team Global News Marathi: