एकनाथ खडसे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा; आता पुढे काय ?

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22) खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. तसेच काल (ता.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी थेट भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्याचवेळी त्यांच्या प्रवेशाचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

खडसे यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्वतः खडसे यांनी अधिकृत पक्ष राजीनामा व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यांचे निकटवर्तीय मात्र गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाची माहिती आता देऊ लागले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: