एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटक विधिमंडळात बोम्मई यांचा ठराव

 

कर्नाटकची बाजू भक्कम असून येथील जनतेचे हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आपण कर्नाटकची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. पुढील काळात कर्नाटककडे कुणीही वक्रदृष्टीने पाहिलं, तरी कुठल्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशाराही बोम्मईंनी दिला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचा निषेध करणारा ठराव मांडला असता तो एकमताने मंजूर करण्यात आला. बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे.

येथील जनता आता महाराष्ट्र एकीकरण समितीचा तिरस्कार करू लागली असून महाराष्ट्रातील नेते सीमाभागातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कायदा – सुव्यवस्था अबाधित राखणे, दोन्ही राज्यात सलोखा राखणे, स्थानिक समस्यांवर समन्वयाने तोडगा काढणे, यासारख्या सूचना देण्यात आल्याचं बोम्मईंनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंसह गृहमंत्री यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सीमेवरुन वाद निर्माण झाला होता. या वादाची समाप्ती आणि संविधानमान्य उपायासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना बोलवलं होतं. दोन्ही पक्षांसोबत गृहविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चांगली चर्चा झाली, असं अमित शाह यांनी सांगितलं होतं.

Team Global News Marathi: