ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप

 

साई रिसॉर्टच्या बांधकामातील पैसा मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून आल्याचा ठपका ठेवत ईडीने मंगळवारी १० तास चौकशी केल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांची बुधवारी ईडीने पुन्हा सात तास चौकशी केली. सध्याच्या राजकीय स्थितीत मला ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अशी प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयातून रात्री साडेदहाच्या दरम्यान बाहेर पडतेवेळी दिली.

परब यांना ईडीने बुधवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परब दुपारी पावणे चारच्या दरम्यान ईडी कार्यालयात हजर झाले. आपल्या मालकीचे कोणतेही रिसॉर्ट नाही आणि हे मी यापूर्वीच तपास यंत्रणांना स्पष्ट केल्याची प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयात जातेवेळी पत्रकारांना दिली.

मंगळवारी झालेल्या दहा तासांच्या चौकशी दरम्यान परब यांनी काही कागदपत्रेदेखील तपास अधिकाऱ्यांना सादर केली. या प्रकरणी १५ जून रोजी देखील परब यांना ईडीने चौकशीसाठी तसेच जवाब नोंदविण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी ते शिर्डी येथे गेले होते.

Team Global News Marathi: