ED ने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, मनसेने लगावला टोला

 

मुंबई | मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तामध्ये राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने या कारवाईचे समर्थन केलं आहे. तर, मनसेनं राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल, अशा शब्दात राऊत यांनी कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच, महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या अशातच मनसेनंही राऊत यांच्या या कारवाईनंतर त्यांची खिल्ली उडवली आहे.

मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या कारवाईसंदर्भात मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला केलेल्या भाषणातील मुद्दा जोडत खोपकर यांनी राऊतांची खिल्ली उडवली. मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली, अशी बोचरी टीका मनसेनं केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हे ट्विट रिट्विट करत राऊतांची खिल्ली उडवली आहे.

Team Global News Marathi: