धक्कादायक | आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला,

सध्या राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता उस्मानाबाद मध्ये सुद्धा अशीच घटना समोर आली आहे. आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या परंडा पोलीस पथकाच्या डोळ्यांत चटणी टाकून काठ्या-कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री परंडा शहरानजीक घडली आहे.

परंडा शहराजवळ असलेल्या वस्तीवरील काही जणांविरुद्ध तक्रार होती. औदुंबर प्रकाश पाटील यांच्या शेतीच्या वादातून हा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या तपासासाठी परंडा ठाण्यातील पोलीस पथक पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान तपासप्रमुख उपनिरीक्षक राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन याच हाणामारीत रूपांतर झाले.

पथकातील महिला कर्मचारी शबाना मुल्ला यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचताच पाटील कुटुंबीयांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून तुफान दगडफेक केली. या घटनेत उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: