ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्रं, पळ म्हटलं की पळतो

 

ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं.ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं. ईडी चावण्याची भीती दाखवून भाजप आपल्याकडे नेत्यांना वळवून घेत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून ईडीविरोधात आक्रमक आंदोलने केली जात आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पटोले यांनी ही टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, केंद्र सरकारची दादागिरी सुरू आहे. इंग्रजांच्या अत्याचाराप्रमाणे भाजप सरकारचा देशात अत्याचार सुरू आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून केंद्र सरकारविरोधात आम्ही लढत राहणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

देशभर आंदोलन सुरु असतानाच मुंबईत युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. बोरिवली स्टेशनवर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरु असून, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

कल्याणमध्ये देखील कल्याण-डोंबीवली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन छेडण्यात आलं. कल्याणपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुड बुद्धीनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

नागपुरमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने ईडी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन सुरु केलं आहे. काल नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली होती. त्यानंतर आज नागपूर पोलिसांनी इडी कार्यालयासमोर चोख सुरक्षा व्यवस्था लावली आहे. बॅरीकेटिंग करुन ईडी कार्यालय असलेल्या सिजीओ कॉम्प्लेक्स परिसरचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

Team Global News Marathi: