“ईडी आणि सीबीआय हे भाजपचे चंगू- मंगू आहेत” खासदार विनायक राऊत यांची टीका

 

मुंबई | राज्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. यानंतर नारायण राणे यांना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र दुसरीकडे भाजपा शिवसेना वाद आणखी चिघळलेला दिसून आला होता.

नारायण राणे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाशिक आणि उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला ,असा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

भाजपच्या या मागणीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. भाजपकडे सध्या ईडी आणि सीबीआयसारखे दोन चंगू मंगू आहेत. भाजपला जे लोक विरोध करतील त्यांच्यावर हे शुक्लकाष्ट लावायचं हीच त्यांची रणनिती आहे. त्यांनी कितीही चौकशा लावू द्या. महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल. तसेच भाजपला जे काही करायचं आहे, त्यांनी करावं कोणीही त्यांचे हात बांधले नाहीत, असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: