व्यावसायिक जितेंद्र नवलानींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला मुंबई हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची आणि तूर्त तपासाला स्थगिती देण्याची मागणी ईडीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. त्यावर बुधवारी झालेल्या न्या. मिलिंद जाधव आमि न्या. अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून जितेंद्र नवलानी खंडणी उकळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एसीबीने ५ मे रोजी जितेंद्र नवलानीविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश नव्हता. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
आता या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावं अशी मागणी केली. ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देऊन नवलानीने व्यावसायिकाकडून ५८ लाख रूपये घेतले असा आरोप एसीबीने केला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आता कोर्टाने एक प्रकारे शिवसेनेला धक्का दिला आहे. कारण या प्रकरणाची चौकशी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.