मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार ‘हो हो बस !

 

मुंबई | बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रम लवकरच शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉप ऑन, हॉप ऑफ (हो-हो) बस सेवा सुरू करणार आहे. तसेच शहरात फिरण्यासाठी पर्यटक आता त्यांच्या पसंतीची ठिकाणे निवडू शकतील, हवे तिथे खाली उतरून स्थळे एक्सप्लोर करू शकतील आणि पुढील थांब्यासाठी दुसऱ्या बसमधून प्रवास करू शकतील. यासाठी बेस्टने लोकांना या बसच्या डिझाईनच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बेस्ट या बसचे नियंत्रण करणार असून, त्या मुंबईच्या सीएसएमटी ते जुहू दरम्यान चालवण्याचे नियोजन आहे.

या पूर्णतः वातानुकूलित बसेस असून त्यामुळे पर्यटनाचा चालना मिळणार आहे. या बससेवेचा लाभ घेऊ इच्छित असणारे पर्यटक तिकीट आणि त्यांची जागा ऑनलाइन बुक करू शकतील. ही बस अनेक ठिकाणी थांबेल. प्रवासी संपूर्ण ठिकाणी प्रवास करू शकतील किंवा त्यांना हवी ती ठिकाणे निवडू शकतील. यासाठी फक्त एक तिकीट खरेदी करावे लागेल.

बेस्टने बुधवारी ‘डिझाइन मुंबई हो हो बस अभियान’ सुरू केले. या अंतर्गत लोक मोहिमेत सहभागी होऊन बसची रचना सुचवू शकतात. लोकांना नवीन बससेवेशी जोडणे आणि या बसेसना स्थानिक स्वरूप देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सीएसएमटी ते जुहू दरम्यान हो हो बस सेवा सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत दर ३० मिनिटांनी उपलब्ध असेल. यासाठी लोकांना २५० रुपये एकेरी भाडे द्यावे लागणार आहे. प्रवासी कोणत्याही बसस्थानकावरून उतरू शकतात आणि त्याच तिकिटाद्वारे प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर त्याच मार्गावर येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये चढू शकतात.

Team Global News Marathi: