प्रत्येक घटकाच्या योगदानातूनच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल – राज्यपाल

 

कोल्हापूर | भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्ष म्हणून स्नातकांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्केयांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या ऑनलाईन समारंभात सुमारे ३५०० जण सहभागी झाले.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सध्या जग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यावर उपाय योजण्याचे काम युवा पिढीच सक्षमपणे करु शकते. नवोन्मेष, नवविचार आणि दर्जा या बळावर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे, ही बाब नवपदवीधर विद्यार्थ्यांनी सदैव लक्षात ठेवावी. पदवीची प्राप्ती ही या नवीन प्रवासाची खरी सुरुवात आहे. त्यामुळे आयुष्यात कोणतेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन करा आणि उच्च ध्येय ठेवून वाटचाल करा असे ते म्हणाले.

इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे विशेष स्थान आहे, तसेच स्थान शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य योग्य दिशेने सुरु असून ते देशातील प्रगतीशील विद्यापीठांपैकी एक म्हणून नावाजलेले आहे. यापुढील काळातही विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत अधिकाधिक लौकिक प्राप्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Team Global News Marathi: