संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; प्रहार’मधून साधणार सेनेवर निशाणा

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. तर दुसरीकडे संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहायला मिळाली होती. त्यातच आता राणेंनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. माझ्या मुलांची बरोबरी त्यांनी करू नये. नाहीतर मलाही ‘सामना’तल्या लिखाणावर ‘प्रहार’ मधून उत्तर द्यावं लागेल, असा घणाघात केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. ते आज कणकवलीत जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश आणि नितेश यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राणे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. “माझ्या मुलांवर टीका करण्याआधी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल”, असं नारायण राणे म्हणाले.

Team Global News Marathi: