ग्रामीण महाराष्ट्रात सुरू झालीय एक नवी मोहिम!

ग्रामीण महाराष्ट्रात एक अपूर्व घटना घडतेय, एका जटील समस्येबाबत अंतर्मुख होत शेतकरी समाज व्यक्त होतोय, प्रतिसाद देतोय. एक नवं लोण गावोगावी पसरतेय..आजच्या भाषेत व्हायरल होतंय…

…वाढदिवसाला केक कापायाचा नाही, तर केकसारखीच ताज्या फळांची रचना करायची आणि फळे कापून वाढदिवस साजरा करायचा! एक नवा पायंडा, नवी पद्धत रूजवण्याच्या निर्धाराने गावोगावी मित्र-नातेवाईकांत असे फळांच्या केकचे फोटो शेअर केले जात आहेत.

पुढची स्टेज अशी, की ‘होय आम्ही शेतकरी समूहा’ने त्यांच्या फेसबूक पेजवर फळांच्या केकची स्पर्धा जाहीर केली असून, आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. कलिंगड कापण्यापासून सुरू झालेला हा पायंडा अधिक टिकावू, शाश्वत कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. खासकरून बच्चे कंपनी खूश होईल, अशाप्रकारे टरबजू-खरबूज, द्राक्षे, सफरचंद, संत्री, डाळिंबे, केळी यासह स्ट्रॉबेरी, किवी, अननस आदी फळांची निवड व मांडणी डिझाईन केली जात आहे.

…या व्हायरल ट्रेंडची पार्श्वभूमी अशी की, चालू महिन्यात द्राक्षे, केळी, टरबूज-खरबूज अशा सर्वच हंगामी फळांची कमी कालावधीत मोठी पुरवठावाढ झाली. परिणामी बाजारभाव गडगडलेत. अशातच लॉकडाऊनच्या धास्तीमुळे व्यापाऱ्यांकडून कमी दराने बोली लागणे, निर्यातीसाठी कंटेनर शॉर्टेज आदी समस्यांची भर पडत गेली. किरकोळ विक्रीत फळे चढ्या दरात विकली जात असली तरी फार्मगेट किंमती उत्पादन खर्चाच्या खाली पोचलेल्या.

अशा बिकट स्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी वाढदिवसाला केकऐवजी फळांचा पर्याय पुढे आणला आणि टायमिंग जुळल्याने गावोगावी पसरला. गेल्या हंगामात सीताफळ, पेरू, डाळिंब आदी फळांनाही बाजार मिळाला नव्हता. त्यामुळे सर्वच फलोत्पादक या ट्रेंडला प्रतिसाद देत आहेत.

आपण फळे पिकवतोय, पण पुरेशा प्रमाणात खात नाहीत. आपल्या रोजच्या आहारात फळे-भाज्या सॅलड्स घेत नाहीत, ही जाणिवही यामागे आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण खप वाढवू यात, या भावनेतून वाढदिवसाला केकऐवजी फळे उपक्रमाला गती मिळाली. सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉट्सअप या चळवळीचे वाहक आहेत. हे एक विधायक आंदोलन आहे, जे पारंपरिक मीडिया, सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांच्या पाठिंब्याशिवाय सुरू झालंय…

एका समस्येबाबत असे वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं खूपच सूचक आहे, नेमकं कुठे चुकतंय आणि उपाय काय? यासंदर्भात एक सामूहिक प्रतिसाद आहे हा. असा पायंडा खरोखरच रूजला, तर भविष्यात नवे बदल होण्याच्या दृष्टिने खूप आशादायक चित्र दिसतेय…

दीपक चव्हाण,

ग्लोबल न्युज नेटवर्क: