गाईचे शेण, गोमूत्रामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, भाजपा मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

 

मध्यप्रदेश | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाच्या आणि स्वतःच्या अडचणीत वाढ करताना अनेकदा दिसून आले आहेत त्यात आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गाईचे शेण, गोमूत्र यावर विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. गाय, तिचे शेण व गोमूत्राची योग्य व्यवस्था केल्यास राज्यासह देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यास मोठी मदत होऊ शकते, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी व्यक्त केले.

व्हेटर्नरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या महिला शाखेने भोपाळमध्ये आयोजित केलेल्या ‘शक्ती 2021’ परिषदेत त्यांनी हे मत मांडले. बरीच कामे गाय किंवा बैलाशिवाय पुढे जाऊच शकत नाही. त्यांचे दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. गाय, तिचे शेण आणि गोमूत्राच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेला बळकटी देणे शक्य होईल. त्यासाठी योग्य व्यवस्था केली पाहिजे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हल्ली बहुतांश गोष्टी गाईचे शेण आणि गोमूत्रापासून बनवल्या जात आहेत. मध्य प्रदेशच्या काही स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी गाईच्या शेणाचा वापर केला जात आहे, असे चौहान यांनी स्पष्ट केले. गो-पालन छोटय़ा शेतकऱयांसाठी फायद्याचा व्यवसाय कसा ठरू शकतो, याबाबत तज्ञांनी गांभीर्याने काम केले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

 

Team Global News Marathi: