पूर्व उपनगरातही आता ड्राईव्ह इन कोरोना लसीकरणाला सुरवात, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईच्या दादर परिसरात सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रा’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर असाच उपक्रम मुंबईत विविध ठिकाणी राबविण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या पूर्व उपनगरातील नागरिकांनाही आता ‘ड्राईव्ह इन लसीकरणा’च्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

चेंबूरच्या ‘के स्टार मॉल’च्या पार्किंग लॉट मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रा’चे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश फातर्फेकर, नगरसेवक अनिल पाटणकर, सुप्रदा फातर्फेकर, पालिकेचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान, उपविभागप्रमुख अविनाश राणे, विधानसभा संघटक निमिष भोसले,महिला विभाग संघटिका रिटाताई वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चेंबूरच्या के स्टार मॉलच्या पार्किंग लॉट मध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात 60 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना आपल्या गाडीत बसूनच कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवार ही सुविधा सदर केंद्रावर उपलब्ध असून केंद्रावर येण्याच्या आधी नागरिकांनी कोविन ऍपमध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे.

सरकारी आदेशानुसार सध्या केवळ 60 वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच लसीकरणाची सुविधा उपलब्ध असली तरीही येत्या काळात याठिकाणी 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही सुरू होऊ शकते. याशिवाय चेंबूर कॅम्प परिसरातील ‘संत निरंकारी भवन’ येथेही कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: