माहिती नसेल तर बोलू नये, अजित पवारांचा राणेंना टोमणा –

माहिती नसेल तर बोलू नये, अजित पवारांचा राणेंना टोमणा –

 

मुंबई : भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)बोलताना युक्रेनच्या राजधानीचे नाव चुकलेत, यावरून राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोमणा मारला, माहिती नसेल तर बोलू नये. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला, असे करू नये.

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम व मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पवार यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप, त्याचा उद्देश आणि विरोधकांच्या आरोपांवर भूमिका मांडली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमवर विरोधकांचा बहिष्कार होता.

मलिक यांच्या राजीनाम्यावर आक्रमक होण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यावर पवार यांना विचारले असता, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणालेत ”एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. नवाब मलिक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच भूमिका घेतली आहे. मलिक यांची अटक बेकायदा असल्याची बाजू त्यांनी मांडली आहे. त्यासंदर्भात गुरुवारी सुनावणी आहे, न्यायालय काय निर्णय देते हे पाहवे लागेल, असे पवार यांनी सांगितले.

अध्यक्षपदासाठी निवडणूक शक्य

अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीचा राहणार आहे. मागील अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुरेसा वेळ नव्हता. मात्र, या अधिवेशनात ती निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यपाल सकारात्मक भूमिका घेतील, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शंभर टक्के उपस्थित राहतील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: