अजिबात धोका पत्करू नका! घाईघाईत निर्बंध उठवू नका!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तिसऱया लाटेचा धोका आहे आणि दुसऱया लाटेचे शेपूट अजून राहिलेले आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. डेल्टा प्लस या विषाणूचादेखील धोका आहे. जिह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळय़ा (लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी या आधारावर जर नागरिक आरोग्याचे नियम न पाळता व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. तेव्हा शहर अथवा जिह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिह्यांच्या जिल्हाधिकाऱयांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरचित्र प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले की, या सातही जिल्हय़ांत चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱयांनी त्यांच्या त्यांच्या जिह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली. गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

दुसऱया लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱयाच ठिकाणी फिल्ड रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील. त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा. पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

सात जिह्यांनी अधिक काळजी घ्यावी

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलताना सांगितले की राज्यातील या 7 जिह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि 1 मराठवाडय़ातील जिल्हा आहे. आरटीपीसीआर चाचणी वाढविणे, वाडय़ावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वानीच लक्ष द्यावे, असे मुख्य सचिव म्हणाले.

रंग बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये!

अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात; पण हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. साताऱयातील मल्हार पेठ पोलीस इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं. मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसतं ते बघावं लागतं. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात; पण हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे.

लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघतो, त्याला काही अर्थ नाही. पण, एखादा रंग नाही आवडला तर ते बदलण्याचं धाडस सरकारमध्ये असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

पॉझिझिटिव्हिटी रेट राज्याच्या दुप्पट

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.15 इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. रत्नागिरीत पहिल्या लाटेत 3074 रुग्ण तर दुसऱया लाटेत 5600 रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत 1346 तर सध्या 5500, हिंगोलीत पहिल्या लाटेत 660 तर दुसऱया लाटेत 675 रुग्ण आढळले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: