‘आत्महत्या करू नका’ एसटी कर्मचाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मात्र या पुरकरलेल्या बंदचा सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसून येत आहे. त्यातच अद्यापही राज्य सरकारकडून तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच आहे.

याच दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंनी आत्महत्या करु नका असे कळकळीची विनंती केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचं सत्र थांबवा अशी एक अटच संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली. यावेळी कामगारांकडून राज ठाकरेंना आश्वासन देण्यात आलं आहे की, यापुढे एकही कामगार आत्महत्या करणार नाही.

परंतू ही परिस्थिती म्हणजेच विलगीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एक आयोग करावा आणि राज्य सरकारच्या वाहन चालकांना जे वेतन मिळत आहे तेच वेतन एसटीच्या चालकांना आणि वाहकांना मिळावं अशी मागणी केली. राज ठाकरेंची भेट घेतल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही राज ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालतो असे आम्हाला सांगितलं आहे. हा प्रश्न ते मिटवतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर न्याय मिळेल असा विश्वास संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: