“अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा”

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत असून सध्या तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला सुद्धा अनुपस्थित होते. याच मुद्दयावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्यकारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, आणि राज्याला अनागोंदीपासून वाचवावे अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.

गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने महाराष्ट्र निर्णायकी झाला असून मंत्रिमंडळही भरकटले आहे. अगोदरच कोरोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत.

तसेच अशा परीस्थितीत, मुख्यमंत्री मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ असून आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे अशी मागणी डावखरे यांनी केली.

Team Global News Marathi: