शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ब्रिच कँडी रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची घेतलेली ही पहिलीच भेट असून सुमारे अर्धा तास दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करीत असतात. पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवार यांनी केंद्र तसेच राज्य सरकारसोबत शेतकरी, व्यापारी अशा विविध मुद्दय़ांवर  पत्रव्यवहार सुरू केला.

आजारपणानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. कोरोना संसर्गाशी लढा सुरू असताना तौकते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर मोठी हानी केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: