धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता

 

धारावी पुनर्विकासातील रेल्वेच्या जमिनीचे असलेले सर्व अडथळे आता दूर झाले असून, रेल्वेने जागा राज्य सरकारला देण्यास तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या काळातच धारावीचा विकास होणार असल्याचे चित्र आता दिसून येत आहे.

हिमाचल प्रदेशसाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली व राज्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही मंत्र्यांशी चर्चा केली.

धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळे धारावीतील लोकांना त्याच परिसरात वास्तव्य करणे शक्य होणार आहे. ही जागा टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येईल. येथे धारावीतील लोकांचे पुनर्वसन केले जाईल. पुनर्विकासासाठी निविदा काढल्या असून, २५ वर्षांपासूनचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर हायस्पीड रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली. समृद्धीसाठी संपादित जमिनीचा वापर केला जाणार आहे. केवळ ३२ टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. डीपीआर व कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

Team Global News Marathi: