मुंबई – धर्मवीर आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. याच निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी लिहिल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तुमची शिकवण माझ्या मनामध्ये कायम कोरलेली असून मी तुमच्याच तत्वांचे आचरण करत आहे. मी जनसेवेचं व्रत हाती घेतलं असून माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही अशा आशयाची ही पोस्ट आहे.
“उरात भरुनी सदैव आपले स्मरण,
मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण.
करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,
जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण.”
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्याचे काम केले. दिघे यांच्या जाण्याने आधार तुटलेल्या शिवसैनिकांना धीर दिला. शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.