धनुष्यबाणावर खरा हक्क उद्धव ठाकरेंचाच, जनमताचा कौल

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची? धनुष्य बाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार? याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षावर दावा केल्याने यांच्यापैकी एका गटाला धनुष्य बाण देणार की चिन्ह गोठवणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

मात्र धनुष्य बाण हे चिन्ह कोणाला जावं, याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ने केला आहे. धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळायला हवे असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न मटा ऑनलाईनच्या ट्विटर हँडलवरुन विचारण्यात आला होता. या पोलवर ९०० ट्विटराईट्सनी प्रातिनिधिक मतदान केले. ७४.४ टक्के नेटिझन्सच्या मते धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळायला हवे, तर केवळ २५.६ टक्के नेटिझन्सना ते एकनाथ शिंदे यांना मिळावे असे वाटते.

धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेला मिळणे न्यायिक दृष्ट्या योग्य वाटते, असे मत काही जणांनी व्यक्त केले आहे. तर ‘स्वतःचा पक्ष काढा आणि लढा, उगाच दुसऱ्याचे चिन्ह का चोरताय? असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे, तर ‘तीनदा मुदतवाढ देऊनही उद्धव ठाकरे गट कसलेही पुरावे सादर करू शकलेला नाही. शिंदेंनी सगळे पुरावे दिले आहेत’ याकडे कोणी अंगुलीनिर्देश केला आहे. तर ‘दोघांनाही मिळणार नाही, गोठवले जाईल’ असं मत नोंदवलं आहे.

Team Global News Marathi: