मुंबई | भाजपचे हिंदुत्व वाघाचे कातडे पांघरलेल्या गाढव आणि शेळीसारखे असल्याचा आसूड ओढत काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार, अशी ‘जडीबुटी’च भाजपला दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका भाजपच्या जिव्हाळी लागली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्या जन्माआधी भाजपचे नगरसेवक, आमदार होते तसेच भाजपच हिंदुत्वाचा तारणहार असल्याचा दावा करत टीका केली. या त्यांच्या टिकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेना पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये शिवसेनेने लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती, असा दावा केला. तर या टीकेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या प्रत्येक टीकेचे सडेतोड उत्तर देताना, भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर फडणवीसांना दिला असता तर उत्तर देणे सोपे झाले असते असा टोला लगावला.
भाजपचा जन्म 1980च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म 1966 सालचा हे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. या सगळय़ा गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा जोरदार चिमटा संजय राऊत यांनी काढला.