मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच काँग्रेसने सुद्धा हाच मुद्धा उचलून धरत भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष करून टीका केली होती.
केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवून कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याने लसीकरणापूर्वी आपण आरोग्य कर्मचारी असल्याची नोंदणी केली, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तन्मय याने आरोग्य कर्मचारी असल्याचं दाखवून कोरोना लस टोचून घेतली होती. मात्र प्रत्यक्षात तन्मय फडणवीस याच्या ट्विटर फ्रोफाईलवर अभिनेता असा उल्लेख आहे.
अमृता फडणवीस यांनीही तन्मय प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. “कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत! आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा!” असे संदिग्ध ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.