“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”

 

 

मुंबई |  राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. आता फडणवीसांच्या या यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही, असे म्हटले आहे.

 

शनिवार, २६ जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. यावेळी नागपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले होते. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे म्हटले आहे.

 

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: