शरद पवारांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; दिला हा पुरावा

मुंबई – ५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुखांना कोरोनाची लागण झाल्याने वाझे आणि त्यांची भेट शक्य नाही, असा दावा राष्ट्रवादी काॅॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा हा दावा पुरावा देत खोडून काढला. देशमुख हे १५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह पत्रकार परिषद घेत असल्याचा व्हिडिओ फडणवीस यांनी टि्व्ट केला आहे. त्यामुळे पवारांचा दावा हा चुकीचा असल्याचे समोर आले आहे.

शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीर सिंह यांनी केलेले आरोप खोडून काढले. ५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांना कोरोनाची लागण झाली.

 

त्यानंतर ते १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होते, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे परमवीर सिंह यांनी पत्रात नमूद केलेली देशमुख-वाझेंची भेटीची माहिती चुकीची असल्याचे पवार म्हणाले. सिंह यांनी पत्रात नमूद केलेल्या तारखेला देशमुख हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांची वाझेसोबत भेट कशी होऊ शकते ? असेही त्यांनी म्हटले. मात्र, पवारांच्या या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी टि्व्ट करून उत्तर दिले आहे.

“15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?” असे म्हणत फडणवीस यांनी अनिल देशमुखांचे १५ फेब्रुवारीचे एक टि्व्ट हे रिटि्व्ट केले आहे. यामध्ये अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत असल्याचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये देशमुख हे माध्यमांशी भाजपच्या आयटी सेलविरोधात चौकशीची गरज असल्याचे पत्रकरांना सांगत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी अनिल देशमुखांचा बचाव करण्यासाठी केलेला दावा हा चुकीचा असल्याचे समोर आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: