देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भाजपच्या मोर्चाकडे लोकांनी फिरवली पाठ!

 

संभाजीनगर थेंब थेंब पाण्यासाठी त्राहिमाम असे मृगजळ उभे करून मोठा आक्रोश करण्याचा भाजपने घाट घातला. दोन केंद्रीय मंत्री, एक आमदार, पाच पंचवीस माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी आकाशपाताळ एक केले. बैठकांवर बैठका घेतल्या. गल्लीबोळात होर्डिंग्ज लावले. पण सगळा खर्च पाण्यात गेला! 50 हजारांचा मोर्चा निघणार अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली खरी, पण लोकांनी या ‘इव्हेंट’कडे पाठ फिरवली. मोर्चाचा डब्बा गुल झाल्याचे पाहून फडणवीसांचा नुसताच तडतडबाजा वाजला!

संभाजीनगरमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. थेंबभर पाण्यासाठी लोक महाग झालेत असा कांगावा करून भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलआक्रोsश मोर्चा काढण्याचे जाहीर केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक झाडून साऱयांनी शहराच्या गल्लीबोळात बैठका घेतल्या.

स्वयंसेवकांनी मोर्चासाठी फिल्डिंग लावली. ग्रामीण भागातही निरोप गेले. मोर्चाच्या आदल्या दिवशी भाजपच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेऊन पाणीप्रश्नावर अरण्यरुदन केले आणि 50 हजारांचा मोर्चा निघणार असा दावा केला, पण प्रत्यक्षात जमले 8 हजार. आता गर्दी होईल, मग गर्दी होईल अशा आशेवर मोर्चा दोन तास उशिरा निघाला.

मात्र मोर्चानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात मोर्चासाठी आलेल्या महिलांनी 300 रुपये देऊन आपल्याला आणल्याचे सांगून भाजपच्या गर्दीची अब्रू चव्हाटय़ावर आणली. शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीही या व्हिडीओवरून भाजपच्या मोर्चाचा जाहीर पंचनामा केला.

Team Global News Marathi: