देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन

 

महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत. मिडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली ते देत आहेत. अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहेत, फोन कॉल्स आहेत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे इत्यंभूत तपशील त्यात आहेत. साहेब कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलिस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा त्यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील यात आहेत. अनिल देशमुख यांनी केवळ बदल्यांमध्ये नाही, तर इतरही स्त्रोतांतून कसे पैसे कमाविले, छगन भुजबळ यांना पैसे घेऊन कसे सोडण्यात आले, मुंबईची कोण वकिल आहे, जी जसेजला मॅनेज करते, याचेही तपशील यात आहेत. संजय राऊत यांची भेट घेऊन काय नियोजन करायचे, पुढच्या काळात कोणत्या ठिकाणी, कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार, नवाब मलिक यांनी काय जबानी द्यायची, त्यातून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल, रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपीनियन द्यायचे, राजकीय नेत्यांनी त्यांना दिलेली मोकळीक अशी सर्व माहिती आहे आणि सोबतच जयंत पाटील यांच्याशी साधलेला संवाद सुद्धा आहे. एकूणच अतिशय स्फोटक अशा या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यातील तपशील आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्षांना सादर केले आहेत.

Team Global News Marathi: