मुंबई | विक्रांत निधीमध्ये घोटाळा करणारे भ्रष्टाचाराचे मेरूमणी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात आहेत असे सांगत आहेत. तुमची ओळख नसताना, तुम्हाला काडीची किंमत नसताना मांडीवर घेतले आणि आम्ही या नकली व बनावट हिंदुत्ववाद्यांना पोसले. चीनमधील बनावट मालाप्रमाणे हे बनावट हिंदुत्ववादी आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर तोफ डागली.
सध्या दमदाटी करण्याचे आणि सुके डोस देण्याचे काम सुरू आहे. देशाच्या शत्रूंपेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. २६ ते २९ मे या काळात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱयांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला.
शिवसेना पदाधिकाऱयांशी संवाद साधताना ते म्हणाले की, खूप दिवसांनी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहोत. दोन-अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली. पण इतर पक्ष कोणत्याही मुहूर्ताची वाट न बघता गावोगावी जात आहेत, लोकांशी संपर्क साधत आहेत. आपणही मागे राहून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीला वेळ आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होतील.
आज आपण दोन-चार महापालिकांवर जोर दिला आणि इतर महापालिकांमध्ये युतीत होतो. पण आता आपण युतीमधून वेगळे झालेलो आहोत आणि महाविकास आघाडी केली. या महाविकास आघाडीने कोल्हापूरची पोटनिवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आणि तो घेण्याची गरज होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले.