वडाळा येथील एक्वर्थ पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण !

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घालायला सुरवात केलेली असताना दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाशी लढा देण्यासाठी राज्य सरकार तसेच मुंबई महानगर पालिकेने आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकसंख्याच्या तुलनेने लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी पालिकेच्या सर्व २२७ प्रभागांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे लवकरात लवकर सुरू करा, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या वडाळा येथील एक्वर्थ पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी े मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार अहोरात्र मेहनत घेत आहे.

आज विविध मोहिमांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याविरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. निर्बंधांतही वाढ करण्यात आली असून अत्यावश्यक कारणांसाठी मुंबईकरांनी बाहेर पडावे. राज्य आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्या आणि लसीकरण वाढवण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नाने एक्वर्थ पालिका रुग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी खासदार राहुल शेवाळे, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘एफ-उत्तर’ प्रभाग समितीचे अध्यक्ष रामदास कांबळे, उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, ‘एफ-दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपमुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आणि अधिकारी उपस्थित होते.

Team Global News Marathi: