शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ; वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्लोबल न्यूज – नामवंत साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, ‘महाराष्ट्रभूषण’, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय 100) यांचे आज (सोमवारी) पहाटे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांदरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या पर्वती पायथा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून सकाळी साडेदहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी घरी पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांना दुखापत झाली होती. दरम्यान त्यांना न्यूमोनियाची लागण सुद्धा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. पुरंदरे यांना तात्काळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

छत्रपती शिवरायांचे चरित्र घराघरांमध्ये आणि जर माणसांमध्ये पोहोचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम केले.

पुरंदरे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी शिवचरित्र प्रसाराचे काम केले. राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या सतरा आवृत्या, जगभरातून व्याखाने आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे महानाट्य जाणता राजा चे 12000 प्रयोग असा पुरंदर यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे 11 मार्च 2019 रोजी बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा पुरस्कार त्यांना त्यांच्या राहत्या घरी प्रदान केला होता.

साहित्य संपदा- आग्रा- कलावंतिणीचा सज्जा- जाणता राजा- पन्हाळगड- पुरंदर- पुरंदरच्या बुरुजावरून- पुरंदऱ्यांचा सरकारवाडा- पुरंदऱ्यांची नौबत- प्रतापगड- फुलवंती- महाराज- मुजऱ्याचे मानकरी- राजगड- राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ मध्ये प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीदेखील आहे.

भाषांतरकार – हेमा हेर्लेकर)- लालमहाल- शिलंगणाचं सोनं- शेलारखिंड. (शिवाजी महाराजांच्या काळातील सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अजिंक्‍य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला “सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता. तो रसिकांच्या पसंतीला उतरला होता.)- सावित्री- सिंहगड

ग्लोबल न्युज नेटवर्क: