दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव; या वैभवाशी कसा सामना करणार?

 

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून बंडखोर आमदारांना काही सवाल केले आहेत. सोबतच भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे. ‘मातोश्री’ची परंपरा आणि संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात आणि दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ”शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!” यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे आणि पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख आणि विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात आणि बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार? असा सवाल सामनामध्ये केला आहे.

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या ईर्षेने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. ”आम्ही तडफडायचो, ज्यांच्या विरोधात लढलो तीच माणसे आपल्यासोबत सत्तेत. आपली कामे कशी होणार?” असा प्रश्न या आमदाराने विचारला. 2014 साली भाजप-शिवसेना वेगळे लढले. ज्या भाजपविरोधात शिवसेना लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले. तेव्हा हा क्रांतिकारी प्रश्न कुणाला का पडू नये की, ”ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या बरोबर सत्तेत कसे बसायचे?” हिंदुत्वाचा मुद्दाही तेव्हा उपस्थित केला गेला नाही.

भाजपने तेव्हा हिंदुत्व अजिबात पाळले नाही. तरीही ‘सुरत’फेम अनेक मंत्री नंतर त्या मंत्रिमंडळात सामील झाले. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, ”मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!” आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात आणि दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे. अलीकडे तर पन्नास ‘मोठे खोके’ भरतील इतक्या चपलांचा ढिगारा मिनिटागणिक ‘मातोश्री’वर होत असतो, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे

अग्रलेखात म्हटलं आहे की, हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ”शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!” यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस सरकारात असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांवर अत्याचार होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना मान-सन्मान मिळत नाही. निधीवाटपात वाटा नाही,’ असा जाहीर त्रागा करून मंत्रीपदाचा राजीनामाच दिला होता. तेव्हा भाजपला जी दूषणे दिली तीच आता इतरांना दिली जात आहेत. मुळात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ते महाराष्ट्र व जनतेच्या कल्याणावर आधारित किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर. गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे.

‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो! पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही. राज्य हे अशाच समन्वयाने चालवायचे असते. तिकडे प. बंगालात ‘सेक्युलर’ ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रांवर कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोईत्रांवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’वाद धोक्यात आला नाही. देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही, असं सामनात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: