२०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी, नाना पटोले यांचे स्पष्टीकरण |

 

मुंबई | राज्यात आघाडी सरकारमध्ये सर्वकाही ठीक असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. याच मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने नाराजी दर्शवली होती. मात्र २०१४ मध्ये जसा मोठा धोका झाला तसा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत असे विधान करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

पटोले म्हणाले की, हायकमांडने मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडत आहे. मी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात काहीही बोलत नाही. मी भारतीय जनता पक्षाविरोधी बोलतो. भाजपच्या नीतीवर प्रहार करतो, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला नाना पटोले का गेले नाहीत? असा प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, त्यांची पूर्वनियोजित बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र पटोले यांनी, पवार यांच्या भेटीचे आमंत्रण नव्हते, त्यामुळे आपण गेलो नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद आता चव्हाटयावर आले आहेत.

Team Global News Marathi: