दहावीत पहिल्या 25 मध्ये येणाऱया विद्यार्थ्यांची मेडिकल, इंजिनीअरिंगची फी पालिका भरणार

 

पालिका शाळांमधील दहावीच्या परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणारा गुणवंत विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊन मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असेल तर त्याच्या शैक्षणिक वर्षाची फी पालिका भरणार आहे. पालिकेच्या शाळेतून दरवर्षी पहिल्या 25 येणाऱया विद्यार्थ्यांना सध्या प्रत्येकी 25 हजारांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांची फी भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

पालिका शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत देण्यात येतात. त्याशिवाय मोफत ‘बेस्ट’ प्रवास, डिजिटल क्लासरूम, टॅब यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पालिका शाळेतील शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आता दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱया 25 विद्यार्थ्यांना करीअर घडवण्यासाठी उच्च शिक्षण घेत असल्यास त्यांची फी पालिका भरणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

तसेच या उपक्रमात 2020 मध्ये दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आता बारावी उत्तीर्ण होतील. यातील मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या उच्च शिक्षणाला जाणाऱया विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा पहिल्यांदा फायदा मिळणार आहे. शिवाय तांत्रिक, व्यावसायिक पदवीचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक फी मिळणार आहे. या योजनांमुळे गरीब विध्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे

Team Global News Marathi: