दगडूशेठ गणपती परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल लंपास

 

गौरी विसर्जनानंतर आता गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्य वस्तीत गर्दी आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी जाताना आपला मोबाइल सांभाळा, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे. कारण गडूशेठ हलवाई गणपती ते मंडई या परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला जात आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने आंध्र प्रदेशातील ४ महिलांना मोबाइल चोरताना पकडले आहे.

आगुराम्मा गिड्डीआण्णा गुंजा, आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा, अनिता पिटला सुधाकर , सुशीला इसाम तंपीचेट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.खराडी येथे राहणाऱ्या महिला या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मंडपात मोठी गर्दी झाली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्सची चेन उघडून त्यातील ४० हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला होता. त्याअगोदर काही महिलांचे मोबाइल चोरीला गेले होते. त्यामुळे पोलीस महिलांवर नजर ठेवून हाेते.

तसेच सीसीटीव्हीवरून नजर ठेवण्यात येत होती. त्यावेळी या महिला आढळून आल्या.या महिलांकडे चार मोबाइल आढळून आले. त्यातील तीन मोबाइल हे मुंबईतील लालबाग गणपती मंडळाच्या परिसरातून चोरले होते. चौथा त्यांनी नुकताच एका महिलेचा माेबाइल चोरला आणि त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या. एका तरुणाच्या पँटच्या खिशातून २ हजार रुपयांची रक्कम चोरत असताना संदीप सुनील बोरसे (वय २७, रा. धुळे) या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.

Team Global News Marathi: