संपूर्ण जगामध्ये मागच्या दोन वर्षात कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. या काळामध्ये देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होत. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी कॅग रिपोर्ट सादर करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्येही राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवल्याबद्दल कॅग रिपोर्टमध्ये तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांचं कौतुक करण्यात आलं आहे. अशातच यावर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी कोरोना, लॉकडाऊन, मंदी अशा बिकट परिस्थितीत देखील राज्याचे अर्थखाते यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल कॅग रिपोर्टमध्ये तत्कालिन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे कौतुक केलं आहे. या काळात राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यात सरकारला यश आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच त्याकाळामध्ये अजितदादांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. प्रशासनावरील पकड,उत्तम नियोजन आणि अभ्यास यांच्या जोरावर अजितदादांनी राज्याची आर्थिक बाजू यशस्वीपणे सांभाळली.याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो, असं कौतुक सुळे यांनी केलं आहे.